कर्नाटकमधील मैसुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या अतीस्वच्छतेच्या कंटाळून पतीने तिचा खून करुन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सत्यमुर्ती असे असून त्याच्या पत्नीचे नाव पुट्टमणी असे होते. १५ वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. या दोघांना दोन मुले आहेत. मात्र पुट्टमणी यांना अती स्वच्छतेची सवय असल्याने त्या दिवसभरात अनेकदा आपल्या मुलांना अंघोळ घालायच्या. इतकचं नाही तर त्या घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालायच्या असं त्यांचे शेजारी सांगतात. यावरुन झालेल्या वादातून पतीने पुट्टमणी यांची हत्या केल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छतेच्या नावाखाली…

“मी पुट्टमणी यांच्यासारखी स्त्री पाहिली नाही,” असं त्यांचे शेजरी राजणारे प्रभू स्वामी सांगतात. “मागील आठ वर्षांपासून स्वच्छेतेच्या नावाखाली अंधश्रद्धा वाटाव्यात अशा अनेक गोष्टी पुट्टमणी करायची. आम्ही तिच्या घरात गेल्यास ती आधी अंघोळ करुन या असं सांगेल म्हणून आम्ही त्यांच्या घरी जायलाही घाबरायचो,” असं स्वामी यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितलं.

नोटाही धुवून घ्यायची…

सत्यमुर्ती आणि पुट्टमणी यांना सात आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र मुले जेव्हा जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा ती त्यांना अंघोळ घालायची. इतकचं काय पतीने घरखर्चासाठी दिलेल्या नोटाही ती धुवून वाळत घालायची आणि ‘स्वच्छ करुन’ वापरायची. “तुम्ही कधी नोटा धुवून वापरणारी व्यक्ती पाहिली आहे का? पण पुट्टमणी असं तरायची. कारण वेगवेगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांचे हात नोटेला लागलेले असल्याने त्या स्वच्छ केल्या पाहिजेत असं तिला वाटायचं,” असं या दांपत्याचे नातेवाईक असणाऱ्या राजशेखर यांनी सांगितलं.

अती स्वच्छतेमुळे अनेकदा वाद…

सत्यमुर्ती याने मला पत्नीच्या या विचित्र वागण्याबद्दल सांगितलं होतं असा दावाही राजशेखर यांनी केला आहे. “स्वच्छतेच्या नावाखाली ती पतीचा आणि मुलांचा छळ करायची. सतत अंघोळ केल्याने मुलंही अनेकदा आजारी पडायची. पण तिने आपला स्वच्छतेचा पाठपुरावा सोडला नाही. टॉयलेटला जाऊन आल्यावर, गुरांना चारा घालून आल्यावर किंवा बाहेरच्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर पुट्टमणी मुलांना अंघोळ घालायची. अनेकदा यावरुन सत्यमुर्ती आणि पुट्टमणी यांच्यामध्ये वाद व्हायचा,” असं राजशेखर म्हणाले.

…अन् घडलेला प्रकार उघडकीस आला

मंगळवारी याच कारणावरुन नवरा बायकोमध्ये वाद झाला. शेतामध्ये काम करतानाच दोघांमध्ये वाद झाला असता संतापाच्या भरात सत्यमुर्तीने पुट्टमणीची कोयत्याने वार करुन हत्या केली. त्यानंतर सत्यमुर्ती घरी आला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली तेव्हा त्यांना सत्यमुर्ती घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळून आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सुत्यमुर्ती यांना खाली उतरवलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वांना पुट्टमणीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह शेतामध्ये अढळून आला.

शेजाऱ्यांचा कबुली जबाब…

मंगळवारी सकाळपासूनच पती पत्नी एकमेकाशी भांडत होते असा जबाब, शेजारी राहणाऱ्या प्रभू स्वामी यांनी नोंदवला आहे. “पुट्टमणी सत्यमुर्तीला अंघोळ करण्यास सांगत होती. यावरुनच त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. अखेर शेतमाल विकण्यासाठी सत्यमुर्ती बाजारात निघून गेला. काही तासांनी तो परत आल्यानंतर त्याने मिळालेले पैसे पुट्टमणीकडे दिले. तिने त्या नोटा धुवून वाळत घातल्या. त्यामुळे पुन्हा दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद घालतच हे दोघे शेतावर गेले आणि नंतर थेट त्यांच्या मृत्यूची बातमी मला समजली,” असं स्वामी यांनी पोलिसांना सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of wifes puritanical ways karnataka man hacks her to death then hangs himself scsg
First published on: 20-02-2020 at 11:13 IST