जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘वॉनाक्राय’ या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसने आता चक्क देवाच्या कॉम्प्युटरवर घाला घातला आहे. तिरूपती देवस्थानच्या कॉम्प्युटरना रॅन्समवेअरचा तडाखा बसला आहे. मंदिरातील कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या १० कॉम्प्युटरचा ताबा घेतला आहे. जगभरातल्या १५० देशांमध्ये लाखो कॉंम्प्युटर्सना झटका देणाऱ्या या ‘वॉनाक्राय रॅन्समवेअर’ने तिरूपती मंदिरातल्या १० कॉम्प्युटरवर घाला घातलाय. खबरदारी घेण्यासाठी मंदिर प्रशासनाने त्यांच्या २० कॉम्प्युटरचा वापर थांबवलाय. मंदिर प्रशासनाने ‘टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस’ची मदत घेत त्या कॉम्प्युटरचा ताबा परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा व्हायरस मायक्रोसॉफ्टच्या जुन्या प्रणालीला लक्ष्य करतो. तिरूपती देवस्थानात व्हायरस आलेले सगळे कॉम्प्युटर हे अशा जुन्या प्रणालीवर काम करणारे होते.

रॅन्समवेअरने बाधित झालेले हे कॉम्प्युटर मंदिरातील कार्यालयीन कामकाजासाठी वापरले जात होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगांची व्यवस्था पाहणारे कॉम्प्युटर रॅन्समवेअरच्या तडाख्यात सापडले नाहीत. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.