देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती देवस्थानालाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. देशातील अन्य मंदिरांप्रमाणे तिरुपती देवस्थानालाही लॉकडाऊन आणि मंदीचा फटका बसला आहे. लॉकडाऊन होण्याआधी तिरुमाला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात भाविकांकडून मोठया प्रमाणावर रोख रक्कम अपर्ण केली जायची. पण आता हे प्रमाण प्रचंड घटले आहे.

त्यामुळे मंदिर व्यवस्थापनला रोकड टंचाईचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिरुमाला तिरुपती देवस्थानाने आता विविध बँकांमध्ये डिपॉझिट करण्यात आलेल्या १२ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कमेवर दर महिन्याला व्याज घेण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी तिरुमाला येथे टीटीडी विश्वस्त मंडळाची बैठक पार पाडली. त्यात हा निर्णय़ घेण्यात आला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

टीटीडीकडून तिमाही, सहा महिन्यांसाठी आणि वर्षभरासाठी विविध बँकांमध्ये रक्कम डिपॉझिट केली जाते. वर्षअखेरीस त्या सर्व डिपॉझिटच्या रक्कमेवर देवस्थानाकडून व्याज घेतले जाते. आता आम्ही तात्काळ प्रभावाने ते सर्व डिपॉझिटस महिन्याभराच्या मुदतीमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बदलामुळे आम्हाला दर महिन्याला व्याज मिळेल, ज्यातून आम्ही कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकतो तसेच मंदिरातील नियमित विधींचाही खर्च भागवता येईल असे टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. श्री वेंकटेश्वर मंदिरातील हुंडीनंतर डिपॉझिटवर मिळणारे व्याज तिरुपती देवस्थानाचे दुसरे सर्वात मोठे उत्पन्न आहे. हुंडीमध्ये रोख रक्केमसह भाविक श्रद्धेने विविध वस्तु अपर्ण करतात.