तुतीकोरीन जिल्ह्यात पोलीस कोठडीत झालेल्या पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी बी सर्वानन यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी के. चंद्रू यांनी केली आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. या प्रकरणात न्याय दंडाधिकाऱ्यांचा न्यायिक अनुचित व्यवहार, अटक करण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शकतत्वांचे उल्लंघन आणि गैरवर्तन स्पष्टपणे दिसते, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे असे के. चंद्रू यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आणि न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अटकेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शकतत्वांचे पालन केले नाही असे के. चंद्रू म्हणाले. आरोपींना हजर केले, त्यावेळी त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही असे सांगून साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी स्वत:चे हात झटकू शकत नाही असे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू म्हणाले. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

“ते जर जखमी अवस्थेत होते, रक्तस्त्राव सुरु होता त्यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्या दुखापतीची चौकशी करायला हवी होती. पिता-पुत्र दोघांमध्येही त्राण नसतील ते लंगडत चालत असतील तर न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारला पाहिजे होता. ते न्याय दंडाधिकाऱ्याचे काम आहे. साथानकुलमच्या न्याय दंडाधिकाऱ्याने कायदा आणि देशाच्या संविधानाचे पालन केलेले नाही त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे” अशी मागणी के. चंद्रू यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण
भारतात तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांवर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. तामिळनाडूमध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध केला आहे. प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार पिता-पुत्र दोघांना पोलीस कोठडीत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

पी. जयराज (५९) आणि जे. बेनिक्स अशी दोघांची नावं आहेत. १९ जून रोजी लॉकडाउन दरम्यान मोबाइलचं दुकान सुरु ठेवलं म्हणून चौकशीसाठी त्यांना साथाकुलम पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोठडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.