23 October 2019

News Flash

दिवास्वप्ने पाहणे मेंदूच्या क्षमताविकासासाठी उपयोगी

काही माणसांना दिवास्वप्ने पाहण्याची सवय असते. या स्वप्न नगरीत त्यांनी अनेक अशक्य गोष्टी शक्य केलेल्या असतात पण म्हणून त्यांना मूर्खाच्या यादीत बसवणे चुकीचे आहे.

| February 25, 2015 12:13 pm

काही माणसांना दिवास्वप्ने पाहण्याची सवय असते. या स्वप्न नगरीत त्यांनी अनेक अशक्य गोष्टी शक्य केलेल्या असतात पण म्हणून त्यांना मूर्खाच्या यादीत बसवणे चुकीचे आहे. दिवास्वप्ने खरी होतात की नाही हा भाग अलाहिदा पण दिवास्वप्नांच्या म्हणजे दिवसा पाहिलेल्या स्वप्नविषयात आपण जेव्हा गुंग होऊन जातो, तेव्हा रोजच्या कंटाळवाण्या विषयांपासून दूर जात असतो. त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते व नंतर आपण कामाला लागतो त्या कामात आपल्याला फार चांगली प्रगती दिसू लागते. तेव्हा दिवास्वप्ने बघायला काहीच हरकत नाही.
     बार इलान विद्यापीठातील संशोधन तरी निदान तसे सांगते. दिवास्वप्नांमुळे मेंदूतील मोठी सर्किट्स कार्यान्वित होतात व त्यामुळे आपण अवघड समस्याही सोडवू शकतो, असे या वैज्ञानिकांचे संशोधन आहे. आपण जेव्हा हे दिवास्वप्न पाहतो, तेव्हा आपल्या मेंदूला मोठी विद्युत ऊर्जा मिळते व आपले विचारही बदलून जातात. मेंदूतील एका विशिष्ट भागामुळे आपल्याला ही दिवास्वप्ने पडत असतात. नेहमीच्या कंटाळवाण्या कामातून मेंदू त्यामुळे मुक्त होतो तसेच चांगली कामे करण्यासाठी त्याची क्षमताही वाढते.
प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात बार इलान्स कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्सच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेले हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.प्रा. मोशे बार हे या संशोधनाचे प्रमुख आहेत. ते व त्यांचे विद्यार्थी वादिम अ‍ॅक्सेलॉर्ड यांनी काही व्यक्तींवर प्रयोग केला. त्यात टी डीसीएस ही वेदनारहित पद्धत वापरून संबंधित लोकांना विद्युत प्रेरणा कमी प्रमाणात दिली, त्यामुळे मेंदूचा काही बाग उद्दीपित झाला. जेव्हा ‘फ्रंटल लोब’ हा भाग प्रेरित झाला, तेव्हा या व्यक्तींचा मेंदू विचाराने भटकायला लागला. याचा अर्थ याच भागामुळे मन भरकटते असे म्हणायला हरकत नाही तर ‘सेंट्रल लोकस’ या भागामुळे आपल्याला एखादी योजना पद्धतशीर तयार करता येते.
फ्रंटल लोब व सेंट्रल लोकस या दोन भागांचा यात काहीतरी समन्वय असतो असे त्यांना वाटले. एफएमआरआय तंत्राने मेंदूचे प्रतिमा चित्रण केले असता मेंदूतील विचार भरकटण्यास फ्रंटल लोब कारणीभूत असतो, असे त्यांना दिसून आले, अपेक्षित निष्कर्षांनुसार मनाचे हे वाढते भटकणे मेंदूला आणखी प्रेरित करीत असते, त्यामुळे हानी होत नाही उलट अवघड कामे आपण चुटकीसरशी उरकून टाकतो. यात फ्रंटल लोब व सेंट्रल लोकस या दोन्ही भागांचा समन्वय असावा असे दिसते. त्यामुळे एक विचारमुक्त अवस्था मेंदूला प्राप्त होते व त्यामुळे त्याला विश्रांती मिळते. त्यात स्वनियंत्रित दिवा स्वप्ने पडत असतात. साधारण १५ ते २० वर्षांपूर्वीपासून वैज्ञानिक मन भटकण्यास कारणीभूत असलेल्या मेंदूतील क्रियांचा व संबंधित ठिकाणांचा शोध घेत होते. तर या मन भटकण्यात मेंदूतील अनेक भाग कार्यान्वित झालेले असतात, जे एरवी काम करीत नाहीत. त्यामुळे माणसाच्या वागणुकीतही फरक पडतो, तो सर्जनशील बनतो, त्याचा मूड बदलतो व तो अवघड कामे करू शकतो कारण मेंदूला पर्यायाने मनाला दिवास्वप्नातून एकीकडे विश्रांती मिळालेली असते. त्यामुळे आनंदित  व प्रमुदित झालेले मन कुठलेही काम करू शकते जे एरवी शक्यतेच्या पातळीवरचेही नसते.

First Published on February 25, 2015 12:13 pm

Web Title: to see daydreams it is useful for the development of brain power
टॅग Brain