गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी बुधवारी होणार असल्याने त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता आहे.
सहा महापालिकांसाठी २६ नोव्हेंबर रोजी, तर ३१ जिल्हा पंचायती, २३० तालुका पंचायती आणि ५६ नगरपालिकांसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. सहा महापालिकांच्या निवडणुकीत केवळ ४५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र अन्यत्र ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि भाजपसाठी या निवडणुका हे आव्हान होते. पटेल आंदोलनानंतर या निवडणुका झाल्या होत्या, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची धुरा आनंदीबेन पटेल यांनी स्वीकारल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच मोठय़ा निवडणुका होत्या.
पटेल आंदोलनानंतर भाजपच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली असल्याने काँग्रेसला राज्यात पुन्हा एकदा जम बसविण्याची आशा आहे. पटेल समाजानेही भाजपऐवजी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते.