रिलायन्स ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा ओघ सुरूच असून आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) जिओ प्लॅटफॉर्मने 6,441.3 कोटी रुपयांमध्ये 1.32 टक्के हिस्सेदारी ‘टीपीजी’ आणि ‘एल कॅटरटॉन’ या दोन मोठ्या कंपन्यांना विकली आहे. यासोबतच जिओ प्लॅटफॉर्म्सला गेल्या आठ आठवड्यांमध्ये 10 गुंतवणूकदारांकडून तब्बल 1,04,326.9 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. सर्वात आधी फेसबुकने 22 एप्रिल रोजी जिओमध्ये 10 टक्के हिस्सेदारी घेतली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजने 0.93 टक्के हिस्सेदारी अमेरिकेच्या टीपीजी या कंपनीला 4,546.80 कोटी रुपयांमध्ये आणि जगातल्या मोठ्या खासगी इक्विटी कंपन्यांपैकी एक असलेल्या L Catterton कंपनीला 1,894.50 कोटी रुपयांमध्ये 0.39 टक्के हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली. शनिवारी जवळपास दोन तासांच्या अंतरात कंपनीने हे दोन मोठे करार केले. 1989 मध्ये स्थापना झालेली एल कॅटरटॉन ही एक खासगी इक्विटी फर्म आहे. तर, 1992 मध्ये सुरू झालेली टीपीजी ही एक ग्लोबल अल्टरनेटिव अॅसेट फर्म आहे. या गुंतवणुकीसोबतच कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म्समधील एकूण 22.3 हिस्सेदारी विकली आहे.

सर्वप्रथम फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 9.99 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं 5,665.75 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील 1.15 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील 2.32 टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत 11,367 कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. तसंच न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकनं 6,598.38 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली होती. यासोबतच केकेआरनंदेखील 11 हजार 365 कोटी रूपयांची गुंतवणूक करून जिओमधील 2.32 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही आशियाई कंपनीत केकेआरनं केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक होती. नंतर पाच जून रोजी अबू धाबीच्या ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’नेही जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करत 1.85 टक्के हिस्सेदारी घेतली. त्याच दिवशी अमेरिकेच्या सिल्वर लेकने 0.93 टक्के हिस्सेदारीसाठी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अजून 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर सात जून रोजी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) या कंपनीने जिओमध्ये 5,683.50 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 1.16 टक्के हिस्सेदारी घेतली आणि आता टीपीजी व L Catterton या अजून दोन कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.