दिवाळी आपल्या कुटुंबासमवेत साजरी करायची परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे मी देखील माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायचं ठरवलं. त्यामुळे मी आज इथे आलो आहे आणि तुमच्यासोबत दिवाळी साजरी करीत आहे कारण तुम्हीच माझं कुटुंब आहात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील राजौरी भागात मोदी सध्या जवानांसोबत दिवाळी साजरी करीत आहेत.

मोदी जवानांशी संवाद साधताना म्हणाले, “आपल्याकडे अनेक सीमावर्ती भाग आहेत. पण तुम्ही देशाच संरक्षण करीत असलेला हा भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ठिकाणी होणारे युद्ध, बंडखोरी, घुसखोरी यांमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. या भागाने कधीही पराजय पाहिलेला नाही. हा भाग केवळ विजेताच नाही तर अजिंक्य राहिला आहे.”

आता काळ बदलला आहे. आपले सैन्य दल हे आधुनिक व्हायला हवे, आपली शस्त्रं आणि दारुगोळा देखील आधुनिक असायला हवा. आपले प्रशिक्षणही जागतिक मानकांप्रमाणे असायला हवे. आपल्या जवानांच्या चेहऱ्यावर कुठल्याही ताणतणाव दिसता कामा नये, अशी अपेक्षा यावळी पंतप्रधानांनी जवानांशी बोलताना व्यक्त केली.