करोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. अशात आता या संकटात चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधला संघर्षही समोर येतो आहे. चीनने अमेरिकेच्या विमान कंपन्यांना चीनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. त्यानंतर उत्तरादाखल अमेरिकेनेही चीनच्या विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक मुद्द्यांवरुन या दोन महासत्ता समोरासमोर आल्याचं चित्र जागतिक स्तरावर दिसतं आहे. ANI ने न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

१६ जूनपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे. अमेरिकेने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे दोन देशांमध्ये असलेल्या विमानांच्या उड्डाणासंदर्भातल्या कराराचं पालन करण्यात चीन अपयशी ठरला आहे. करोनाचा प्रसार वाढण्यास सुरुवात झाली ती चीनमधून. तेव्हापासूनच अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध हे तणावाचे झाले आहेत.

करोना प्रकरणात चीनने जगापासून माहिती लपवली आणि या आजाराचा प्रादुर्भाव होऊ दिला असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने होतो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कोविड १९ च्या विषाणूचे नामकरण चायना व्हायरस आणि वुहान व्हायरस असेही केले आहे. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे चीनने संतापून जात अमेरिकेच्या विमानांना चीनमध्ये बंदी घातली. चीनने हा निर्णय घेताच अमेरिकेनेही चिनी विमानांना अमेरिकेत बंदी घातली आहे. चीनने हवाई वाहतुकीच्या नियमांचे आणि आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केले आहे असाही आरोप अमेरिकेने केला आहे.

एवढंच नाही तर अमेरिका येत्या काळात चीनला दणका देण्यासाठी आणखी कठोर निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. अमेरिकेत चीनच्या नागरिकांना प्रवेशबंदी तसेच चिनी विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश बंदी यांसारखे निर्णयही घेतले जाण्याची चिन्हं आहेत.