अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड याच्या कोठडीतील पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणी देशभरात हिंसक निदर्शने होत असताना जमावाला काबूत ठेवण्यासाठी वेळप्रसंगी आपण लष्कर तैनात करू,असा इशारा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

अमेरिकेतील अनेक राज्यात आफ्रिकी अमेरिकी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूमुळे हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सोमवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी सांगितले की, हजारो सशस्त्र सैनिक , लष्करी जवान, पोलीस पाठवून आपण दंगल, लूटमार, गुंडगिरी, हल्ले, मालमत्तेची हानी हे प्रकार रोखू.

मिनियापोलीस येथे गेल्या आठवडय़ात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीचा श्वेतवर्णीय अधिकाऱ्याने गुडघा मानेवर दाबून घुसमटवल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचारात काही लोक ठार झाले तर अनेक मालमत्ता पेटवून देण्यात आल्याने लाखो डॉलर्सचे नुकसान झाले. दुकाने व मॉल लुटण्यात आले.

ट्रम्प यांनी सांगितले की, मी सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना नॅशनल गार्ड्सचे जवान पुरेशा प्रमाणात तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी लष्कर तैनात करीन, सध्या देशात जे चालले आहे ते शांततामय आंदोलन नाही. हा देशी दहशतवाद आहे. निरपराध लोक मारले जात आहे.

जॉर्ज व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला जाईल, त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशात कायद्याचे राज्य राहील याची हमी देण्यात येत आहे.  हिंसाचार थांबवून अमेरिकेला सुरक्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. दरम्यान, श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी डेरेक चॉविन याच्यावर खुनाचा आरोप दाखल केला असून तो थर्ड डिग्री स्वरूपाचा आहे. त्याला पुढील आठवडय़ात न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान फ्लॉइड याच्या शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर तो मनुष्यवध असल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेतील हिंसाचारानंतर दीडशे शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून सहा राज्यांत व १३ शहरांत आणीबाणी लावण्यात आली आहे. देशात ६७ हजार नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. हिंसाचारात पाच जण ठार झाले असून ४ हजार जणांना अटक  करण्यात आली आहे.

फ्लॉइड याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आणि गूगलचे सुंदर पिचाई या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  आफ्रिकन-अमेरिकी समाजाला पाठिंबा दर्शविला आहे.

पंतप्रधान मोदी यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मंगळवारी करोनाच्या महासाथीबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. आपले मित्र अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आपण सौहार्दपूर्ण आणि परिणामकारक चर्चा केली. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी-७ देशांच्या बैठकीसह, करोनाची साथ आणि इतर विषयांवर चर्चा केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. ही चर्चा करोनानंतरच्या जगाच्या स्थितीसाठी महत्त्वपूर्ण असेल असेही मोदी म्हणाले.