तुलसी प्रजापती बनावट चकमक खटला प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांना वाचवण्याचा प्रयत्न एका स्टिंग ऑपरेशनने उघड केल्यावर काँग्रेसने थेट मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत उपेक्षित समुदायातून पुढे आलेले नेते म्हणून मोदींना भाजप पुढे करते, अशा वेळी मागास समाजातील तुलसीराम प्रजापती या व्यक्तीला बनावट चकमकीत ठार केले जाते हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला. ही बाब गंभीर असल्याचे काँग्रेसचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख अजय माखन यांनी स्पष्ट करत मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही माखन यांनी केला. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर आणि भुपिंदर सिंह यादव यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रजापती चकमक प्रकरणाच्या चौकशीत अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुजरातचे माजी मंत्री आणि मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यामध्ये मुख्य आरोपी आहेत. प्रजापतीचा खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकून त्याच्या आईचा अंगठा घेण्याचा प्रयत्न असल्याचे स्टिंगमध्ये दाखवण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेच्या वेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार पी. एल. पुनिया उपस्थित होते. मागास असलेल्या प्रजापती समुदायाच्या लोकांनी आपल्याकडे न्याय मागितला, असे पुनिया यांनी स्पष्ट केले. तपासावर प्रभाव पाडण्याचा भाजप नेत्यांचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार पुष्पकुमार शर्मा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
‘राजकारणात मर्यादा सांभाळा’
निवडणूक जशी जवळ येईल तसा राजकारणाचा दर्जा घसरणार आहे. मात्र जनता किंवा प्रसारमाध्यमे यावर विश्वास ठेवणार नाहीत असे भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी या स्टिंगचा उल्लेख न करता स्पष्ट केले. काँग्रेसने अशा राजकारणापासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
वंजारांचा राजीनामा; मोदी, अमित शहांवर दोषारोप
अहमदाबाद – निलंबित पोलीस अधिकारी डी.जी.वंजारा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्यावर दोषारोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले वंजारा साबरमती येथील मध्यवर्ती तुरुंगात असून, तेथूनच त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला. गुजरात सरकारला आपल्याला वाचवण्यात रस नसून त्याऐवजी आपण आणि इतर अधिकारी तुरुंगात कसे राहतील असे धोरण राहिले. केवळ स्वत:चा बचाव करण्याची त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोप वंजारा यांनी केला आहे. सोराबुद्दीन शेख चकमकप्रकरणी २००७ मध्ये वंजारा यांना पहिल्यांदा अटक झाली. त्यानंतर तुलसीराम प्रजापती तसेच इशरत जहाँ चकमकप्रकरणी ते प्रमुख आरोपी आहेत. गुजरात सरकारला केवळ माजी गृहमंत्री अमित शहा यांना वाचवण्यात रस आहे. सीबीआयपासून वाचण्यासाठी आणि राजकीय फायद्यांसाठी आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना तुरुंगात ठेवण्यात हे सरकार धन्यता मानत असल्याचा आरोप वंजारा यांनी पत्रात केला आहे. मला, राजकुमार पंडियन आणि दिनेश एम.एन यांना अटक केल्यावर कुणी साधी दखलही घेतली नाही. आमच्या कुटुंबीयांनाही कोणी भेटले नाही, मात्र अमित शहा यांच्यावर कारवाई झाल्यावर सरकार तत्परता दाखवते हा कुठला कारभार, असा सवाल वंजारा यांनी केला आहे. सोराबुद्दीन खटला राज्याबाहेर जाण्यास अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.