दिल्ली विधानसभेत गुरुवारी एक बोगदा सापडला आहे. “हा बोगदा विधानसभा आणि लाल किल्ल्याला जोडतो. स्वातंत्र्य सैनिकांना दुसरीकडे स्थानांतरित करताना प्रतिशोध टाळण्यासाठी ब्रिटिशांनी त्याचा वापर केला असावा, अशी शक्यता एएनआयशी बोलताना दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनी वर्तवली. ते म्हणाले, “जेव्हा १९९३ मध्ये मी आमदार झालो होतो, तेव्हा येथे लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या एका बोगद्याबद्दल अफवा पसरली होती. मी त्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला होता पण त्याबद्दल कोणतीच स्पष्टता नव्हती. आता आम्हाला बोगद्याचा शेवट सापडला आहे, पण आम्ही तो पुढे खोदणार नाही. कारण मेट्रो प्रकल्प आणि गटार बांधणीमुळे बोगद्याचे सर्व मार्ग नष्ट झाले आहेत.”

गोयल म्हणाले, की “१९१२ मध्ये राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवल्यानंतर केंद्रीय विधानसभा म्हणून दिल्ली विधानसभेचा वापर करण्यात आला. त्यानंतर १९२६ मध्ये त्याचे न्यायालयात रूपांतर करण्यात आले आणि ब्रिटिशांनी स्वातंत्र्य सैनिकांना नेण्या-आणण्यासाठी या बोगद्याचा वापर केला. इथे फाशी देण्यासाठी एक खोली आहे, याबद्दल सर्वांना माहिती होती, पण ती कधीच उघडली गेली नाही. आता स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी मी त्या खोलीची पाहणी करण्याचे ठरवले. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून आम्ही त्या खोलीचे रुपांतर मंदिरात करण्याचा विचार करत आहोत.”

“ दिल्ली विधानसभेचा देशाच्या स्वातंत्र्याशी संबंधित इतिहास पाहता, पुढील स्वातंत्र्यदिनापर्यंत पर्यटकांसाठी हँगिंग रूम उघडण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यासाठी आधीच काम सुरू झाले आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात या ठिकाणाचा इतिहास खूप समृद्ध आहे. त्याची पुनर्रचना करण्याचा आमचा हेतू आहे जेणेकरून पर्यटक आणि अभ्यागतांना आपल्या इतिहासाचे प्रतिबिंब पाहता येईल” असेही गोयल म्हणाले.