दारूच्या एखाद-दुसऱ्या पेगसाठी बिहारमध्ये होऊ घातलेल्या सकारात्मक बदलाची वाट का रोखून धरत आहात, असा सवाल उपस्थित करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. ते मंगळवारी बिहारमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. बिहारमध्ये दारूबंदी लागू केल्यानंतर मला जो आनंद आणि समाधान मिळाले आहे, ते आजपर्यंत कधीही मिळाले नव्हते. यानिमित्ताने बिहारमध्ये एक मोठा सकारात्मक बदल होऊ पाहत आहे. एखाद-दुसऱ्या पेगसाठी काही लोक हे सगळे उद्धस्त का करू पाहत आहेत? त्याऐवजी या लोकांनी घरातील लाईट बंद कराव्यात आणि फळाचा ज्यूस प्यावा. तुम्हाला दारू प्यायलासारखेच वाटेल, असे नितीश कुमार यांनी म्हटले. बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. बिहार हे देशातील चौथे “ड्राय स्टेट‘ आहे. नितीश यांच्या या निर्णयामुळे बराच गदारोळही निर्माण झाला होता. दारूबंदीमुळे बिहार सरकारला वर्षांला किमान चार हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.