सोशल मीडिया कंपनी ट्विटरने एका नकाशाद्वारे भारताचा लडाखचा भूभाग हा चीनच्या हद्दीत दाखवला होता. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या या नकाशावर भारताने आक्षेप घेतला होता. याची दखल घेत ट्विटरने आपल्या या चुकीबद्दल माफी मागितली आहे. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही चूक सुधारणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या संसदीय समितीच्या अध्यक्षा मिनाक्षी लेखी यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, “ट्विटरने समितीकडे माफी मागितली असून आपली चूक सुधारण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतचा अवधी मागितला आहे.”

भारताच्या नकाशाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यासाठी ट्विटर आयएनसीचे मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन करेन यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माफी मागितली आहे. गेल्या महिन्यांत डेटा सुरक्षा विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीने लडाखला चीनचा भाग दाखवल्याबद्दल ट्विटरवर मोठी टीका केली होती. समितीने म्हटलं होतं या पद्धतीचं वागणं हे देशद्रोहाच्या प्रकारात मोडतं. त्यामुळे ट्विटरने माफी मागावी अशी मागणी भारताने केली होती. तसेच ट्विटरने आपली चूक लवकरात लवकर सुधारावी असा इशाराही दिला होता.

दरम्यान, ट्विटरने संसदीय समितीसमोर माफी मागितली आहे. समितीनं इशारा देताना म्हटलं की, “अशा प्रकारची चूक हे गुन्हेगारी कृत्य असून यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला ठेच लागते.” समितीनं म्हटलं होतं की माफीसाठी ट्विटर इंडियाच्या मार्केटिंग आर्मकडून नव्हे तर ट्विटर इंकच्यावतीने एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावं. याप्रमाणेच ट्विटरने माफीनामा सादर केला आहे.