News Flash

साताऱ्याचे जवान संदीप सावंत दहशतवाद्यांशी लढताना शहीद

घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखत असताना सावंत यांना वीरमरण

साताऱ्याचे जवन संदीप सावंत यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे. नौशेरा या ठिकाणी ही घटना घडली. संदीप सावंत हे सातारा जिल्ह्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते. २५ वर्षीय संदीप सावंत यांच्यामागे त्यांची पत्नी सविता या आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी सज्ज झाले. दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे नेमकी संख्या समजू शकली नाही. मात्र संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आलं.

नाईक संदीप सावंत आणि रायफलमॅन अर्जुन थापा या दोघांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहिल अशा शब्दात ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

नौशेरा परिसरात ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली. शोधमोहीम सुरु असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीरमध्ये २०१९ या वर्षात १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली अशी माहिती जम्मू काशमीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

संदीप सावंत २८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन १८ मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. संदीप सावंत शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, एक मुलगी, आई-वडील, काका, चुलत भाऊ, बहीण असे कुटुंब आहे. गुरुवारी शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव पुण्यात आणले जाईल. तिथून त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल अशीही माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 6:22 pm

Web Title: two jawans laid down their lives combating infiltrators in naushera sector of jk in the intervening night of dec 31 and jan 1 scj 81
Next Stories
1 खळबळजनक : प्रसिद्ध गायकाची मुलगी आणि पत्नीसह हत्या
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जिग्नेश मेवानींचा हल्लाबोल
3 १९९२ कोटींच्या मालकाचा लिफ्ट कोसळून दुर्दैवी अंत
Just Now!
X