टि्वटरने अभिनेत्री कंगना रणौतचे दोन टि्वटस काढून टाकले आहेत. कंगनाच्या या टि्वटसमुळे टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वटस हटवण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर कंगनाचा सध्या वाद सुरु आहे. टि्वटरवरुन कंगना अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या शब्दांमध्ये टीका करत आहे.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टि्वट केल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाने रिहानासह देशातील सेलिब्रिटींवरही जोरदार टीका केली. गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबरच तिचा वाद चांगला गाजला. दिलजीतला तिने खलिस्तानी म्हटले. शेतकऱ्यांबद्दलही तिने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यामुळे अनेक युझर्सनी टि्वटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या टि्वटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.

आणखी वाचा- रिहानासंबंधीत केलेले कंगनाचे जुने ट्वीट चर्चेत

मागच्या महिन्यात काही तासांसाठी कंगनाचे टि्वटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. सध्या सुरु असलेल्या वादात, कंगनाने जे टि्वट केले होते, तिथे आता “टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वट आता उपलब्ध नाही असा मेसेज येतोय.”

आणखी वाचा- कंगनाने दिलजीतला ठरवलं खलिस्तानी, दोघांमध्ये जोरदार टि्वटर वॉर

कंगनाने दिलजीत दोसांझला काय म्हटलं?
“याला पण आपले दोन रुपये बनवायचे आहेत, याची प्लानिंग कधीपासून सुरु होती? व्हिडिओ बनवायला आणि नंतर घोषणा करायला, कमीत कमी एक महिना तर लागेल आणि हे सर्व ऑर्गेनिक आहे, यावर आपण विश्वास ठेवावा, अशी त्यांची इच्छा आहे” असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. #Indiatogether #IndiaAgainstPropoganda असे हॅशटॅगही तिने दिले होते.

“माझ एकच काम आहे देशभक्ती. तेच मी दिवसभर करत असते. मी तेच करत राहणार. पण खलिस्तानी तुला तुझं काम करु देणार नाही” असे कंगनाने म्हटलं होतं.