राज्यसभेची तिसरी जागा जिंकण्यासाठी भाजपने टाकलेल्या गळात काँग्रेसचे आमदार अलगदपणे अडकत चालले असून, दोन नव्या राजीनाम्यांमुळे आतापर्यंत राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या सात झाली आहे. या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसची दुसरी जागा धोक्यात आली असून, भाजपची तिसरी जागा जिंकण्याची खेळी यशस्वी होईल, अशीच चिन्हे दिसतात.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह राज्यात तीन उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. निवडणुकीची नवी तारीख जाहीर झाल्यावर आणखी दोन आमदारांनी गुरुवारी राजीनामे सादर के ले. राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या सात झाली असून, आणखी काही आमदार राजीनामे देतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.

दोन जागा जिंकण्यासाठी काँग्रेसकडे काठावरचे संख्याबळ होते. सात आमदारांच्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले. परिणामी काँग्रेसची दुसरी जागा निवडून येणे कठीण मानले जाते. आमदारांचे संख्याबळ घटल्याने एकूण मतदारांचे प्रमाण कमी होऊन उमेदवारांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचे प्रमाणही कमी झाले. नव्या संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. कारण तीन उमेदवारांच्या विजयासाठी भाजपकडे आता पुरेशी मते उपलब्ध असतील. दोन वर्षांपूर्वी अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपने काँग्रेस आमदारांची फोडाफोडी केली होती; पण पटेल यांना निसटता विजय मिळाला होता. या वेळी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते नरहरी अमिन यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून भाजपने साम, दाम, दंड, भेद यांचा वापर सुरू केला आहे. आमदारांना मोठय़ा रकमेची प्रलोभने दाखवण्यिात आली. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांना मोठी रक्कम दिली जात आहे. भाजपकडून रडीचा डाव खेळला जात आहे.

– खासदार राजीव सातव, गुजरात काँग्रेसचे प्रभारी