उत्तर प्रदेशातील आग्रा- नोएडा युमना एक्स्प्रेस वे वर गुरूवार दुपारी जवळपास सव्वा एक वाजेच्या सुमारास मोठा अपघात टळला. एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षणार्थी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवल्याने, या विमानाचं इमरजन्सी लॅण्डिंग करावं लागंलं. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अपघात टळला.

प्राप्त माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या ट्रेनी एअर क्राफ्ट (सेशना फाइव टू) ने अलीगढ येथील धनीपूर धावपट्टीवरून हरियाणामधील नारनौल येथे जाण्यासाठी जवळपास १२.३० वाजता उड्डाण घेतलं होतं. या टू-सीटर विमानाने उड्डाण घेतल्यानंतर जवळपास २५ मिनिटांनी त्यामध्ये तांत्रिक बिघाड उद्भवला. याबाबत पायलटने तत्काळ आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली व त्यानंतर या विमानचं इमरजन्सी लॅण्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यावेळी विमान उतरवलं जाणार होतं, तेव्हा हे विमान यमुना एक्स्प्रेस वे वर उडत होतं. पायलटने पाहिलं की या मार्गावर वाहतुक नसल्यासारखीच आहे. त्यामुळे त्यांनी विमान या मार्गावरच उतरण्याचा निर्णय घेत, ते यशस्वीपणे उतरवलं.

दुपारी एक वाजेच्या सुमारा या विमानाचं यशस्वीपणे लॅण्डिंग झालं. यावेळी पायलटने संपूर्ण दक्षता घेतली. यावेळी मुख्य पायलटसोबट ट्रेनी पायलट देखील विमानात होता.

विमान महामार्गावर उतरल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. विमान सुरक्षितरित्या मार्गाच्या कडेला उतरवण्यात आल्याने, वाहतुकीसही काही अडथळा झाला नाही. यानंतर कंपनीचे अभियंता विमानाच्या दुरूस्तीसाठी घटनास्थळी पोहचले. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे विमान १०-१२ वर्षे जुनं होतं, त्यामुळे त्याच तांत्रिक बिघाड उद्भवला.