देशातील विविध महाविद्यालयांतून सुरू असलेले पारंपरिक बी. ए., बी. एस्सी हे पदवी अभ्याक्रम बंद करून त्या जागी मानवता व विज्ञान विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा विचार आहे. हे नवीन अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असतील. बी.ए, बी.एस्सी या पदवी घेतलेल्या मुलांना रोजगार मिळत नाहीत असे लक्षात आल्याने हे अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरविले आहे असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष एच.देवराज यांनी सांगितले. असे असले तरी हा निर्णय लगेच अमलात येणार नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुरुवात व एकूणच महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेतील हे स्थित्यंतर येत्या दहा वर्षांत घडून येईल असे त्यांनी सांगितले. नवीन बी. व्होक (बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन) हा अभ्यासक्रम २०० महाविद्यालयांत सुरू केला जाणार असून त्यात १०० तंत्रनिकेतने (पॉलिटेक्निक) व १०० कला महाविद्यालये यांचा समावेश असेल. गरजेनुसार जास्तीत जास्त व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जातील असे ते म्हणाले. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत खासगी संस्थांना २५ हजार कोटी रुपये विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देणार असून  बाराव्या योजनेत ५०००० कोटी रुपये दिले जामार आहेत. यात महाविद्यालयांना कामगिरीच्या आधारावर पैसे दिले जातील. त्यात शिक्षकांची उपलब्धता, गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी संख्या या निकषांवर हा निधी दिला जाणार आहे. शैक्षणिक संस्थात उत्तरदायित्वाची भावना वाढावी हा त्यामागचा हेतू असल्याचे सांगून ते म्हणाले की, अमेरिका व ब्रिटन यासारखे देशही उच्चशिक्षणावर भारताइतका खर्च करीत नाहीत.