संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचा भारत-पाकिस्तानला चर्चेचा सल्ला

संयुक्त राष्ट्रे : काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी बुधवारी नकार दिल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानने चर्चेची प्रक्रिया सुरू करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या ४२व्या परिषदेत, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यावरून पाकिस्तानने आगपाखड केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय निरीक्षकांकडून तेथील स्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली होती. भारताने मात्र ती मागणी धुडकावत, काश्मीरबाबतचा निर्णय हा आमचा सार्वभौम अधिकार असून त्यात अन्य कोणत्याही देशाचा हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन जेरिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘‘गुटेरेस यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जी-७ समूह देशांच्या परिषदेप्रसंगी तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशीही ते बोलले आहेत.’’

‘‘पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांतील स्थायी दूत मलिहा लोधी यांच्या विनंतीवरून गुटेरेस यांनी सोमवारी त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र या प्रत्येक भेटीत, उभय देशांनी संबंध विकोपाला जाऊ न देता चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, हे सांगितले आहे,’’ असेही जेरिक म्हणाले.

सहमती नसल्याने हस्तक्षेप अशक्य

संयुक्त राष्ट्र आमसभेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान येणार आहेत. तेव्हा गुटेरेस मध्यस्थी करतील का, या प्रश्नावर प्रवक्ता म्हणाला की, ‘‘जोवर दोन्ही देशांची सहमती नसते तोवर आम्ही मध्यस्थी करीत नाही. भारताने काश्मीरप्रश्नी कोणत्याही हस्तक्षेपास नकार दिल्याने आम्ही मध्यस्थी करणार नाही.’’