भारतातल्या १७ बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाला वेळ लागू शकतो. कारण त्याच्या प्रत्यार्पणाच्या मार्गात एक कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे जी सोडवल्याशिवाय मल्ल्याला भारतात आणणं शक्य होणार नाही. ही कायदेशीर अडचण सोडवल्यानंतरच विजय मल्ल्याला भारतात आणता येणं शक्य आहे. भारताला ब्रिटिश उच्चायोगाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. ही अडचण नेमकी काय आहे हे मात्र गोपनीय असल्याचं ब्रिटिश उच्चायोगाने म्हटलं आहे.

ब्रिटिश उच्चायोगाने काय म्हटलं आहे?

UK मधील कायद्यानुसार एक कायदेशीर अडचण सोडवल्याशिवाय भारतात विजय मल्ल्याचं प्रत्यार्पण शक्य नाही. ही कायदेशीर अडचण काय आहे? ते गोपनीय ठेवण्यात आलं आहे. ही अडचण सोडवली गेल्याशिवाय विजय मल्ल्याला भारतात पाठवलं जाणार नाही. ही अडचण सोडवण्यास नेमका किती कालावधी लागेल हे आत्ता सांगता येणार नसल्याचंही ब्रिटिश उच्चायोगाने सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

यू के येथील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र आता एक कायदेशीर अडचण असल्याचे ब्रिटिश उच्चायोगाने म्हटलं आहे. विजय मल्ल्याला लिकर किंग ही उपाधीही लावण्यात आली होती. तसंच बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला होता.