मध्य प्रदेशमधील राजकीय उलथापालथीनंतर तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्यानंतर अखेर काँग्रेस नेते राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपलं मौन सोडलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेस सोडून दुसरा मार्ग पत्कारलेलं पाहणं हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या मार्गावर जाणं हे दुर्दैवी आहे. मला वाटतं पक्षात चर्चेतून तोडगा काढता आला असता. असं सचिन पायलट यांनी ट्विट केलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे पाठोपाठ सचिन पायलटही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश करतील का यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट हे दोघेही राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

आणखी वाचा- “ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितल्यास मी विहिरीतही उडी मारेन”

या अगोदर मध्य प्रदेशमधील राजकीय नाटयमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सचिन पायलट यांनी मध्य प्रदेशामधील काँग्रेस पक्षात सुरू असलेला संघर्ष लवकरच संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शिवाय, जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी राज्यात स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले होते.