मुसलमानांचे मन जिंकण्यासाठी मोदी सरकारला आणखी खूप कष्ट घ्यावे लागेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. मोदी सरकारने मुस्लिमांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्याची माहितीही मुस्लिमांना सांगितली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या विकासाबाबत आणि तिहेरी तलाकच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या प्रयत्नांची माहिती २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लिमांना दिली जाईल, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तारमध्ये काही तिहेरी तलाक पीडित महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, मुस्लिमांचे मन जिंकण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यांच्या डोक्यात मागील ७० वर्षांचे विष भिनलेले आहे. पण ही चांगली गोष्ट आहे की, नवीन पिढी आणि महिला भाजपाला त्यांचा चांगुलपणा आणि वाईट गोष्टींच्या मुद्यावर चाचपून पाहत आहे. हे एक मोठे सकारात्मक परिवर्तन आहे.

कैराना पोटनिवडणुकीतील पराभवामुळे काहीच फरक पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण आम्हाला पुन्हा एकदा पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतच्या रणनीतीवर विचार करावा लागणार आहे. आम्ही यापुढे सर्वच निवडणुकीत पराभूत होऊ, असा कैरानामधील पराभवाचा अर्थ होत नाही. आम्हाला हेही माहीत आहे की, सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन निवडणुका लढतील. पण आम्हाला योग्य रणनीती अवलंबावी लागणार आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाकडून मुस्लिमांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर होतो, असा आरोपही त्यांनी केला.