केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून प्रथम आलेली टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसरा आलेला अतहर आमिर उल शफी खान हे दोघंही नुकतेच विवाहबंधनात अडकले. जम्मू काश्मिरमधली पहलगाम क्लबमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

टीना दाबी आणि अतहरची ही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटात किंवा कथा-कादंबरीमध्ये शोभणारीच होती. यूपीएसीत पहिली आलेली टीना आणि दुसरा आलेला अतहर एकमेकांच्या प्रेमात पडतील अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. तो पहिल्याच भेटीत माझ्या प्रेमात पडला, ही पहिली प्रतिक्रीया तिनं अतहरविषयी बोलताना दिली होती. या दोघांच्या यशासोबतच त्यांची प्रेमकहाणीदेखील वर्षभर चर्चेचा विषय ठरली होती. टीना आणि आमिर दिल्लीच्या केंद्रीय मनुष्यबळ खात्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात पहिल्यांदा भेटले. पाहताक्षणी हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याच दिवशी संध्याकाळी अतहर थेट टीनाच्या घरी जाऊन पोहोचला होता.

विशेष म्हणजे या दोघांनीही त्यांच्यातील प्रेमसंबंधाबद्दल कोणताही आडपडदा ठेवलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली जगाला दिली होती. त्यामुळे ‘टॉपर्स’च्या प्रेमकहाणीची चर्चा जगभर झाली. पण या दोघांच्या लग्नाला मात्र त्यानंतर तीव्र विरोध झाला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या नात्यावर सडकून टीका केली होती. ‘अतहर आमिर खानचे टीना दाबीबरोबरील लग्न म्हणजे भारतात सुरू असलेल्या लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याचा आरोप हिंदू महासभेचे राष्ट्रीय सचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी २०१६ मध्ये केला होता. कट्टरपंथील मुस्लिमांकडून भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत टीनाच्या आई-वडिलांनी यासंबंधी टीनाला योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. पण कोणत्याही टीकांना भीक न घालता या दोघांनी अखेर लग्न केलं आणि आपली प्रेमकहाणी यशस्वी करून दाखवली.