मुस्लीमबहुल सात देशांमधील नागरिकांना देशांत प्रवेश देण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेले र्निबध मागे घेण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अ‍ॅण्टोनिओ ग्युटर्स यांनी केले आहे. अमेरिकेचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचा हा उत्तम मार्ग नाही, उलटपक्षी त्यामुळे चिंता आणि संताप पसरेल, असे ग्युटर्स यांनी म्हटले आहे.

मुस्लीमबहुल देशांमधील नागरिकांना देशांत प्रवेश देण्यावर र्निबध घालणे हा अमेरिकेचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग नाही, हा परिणामकारक मार्गही नाही, त्यामुळे या उपाययोजना शक्य तितक्या लवकर मागे घेतल्या पाहिजेत, असे ग्युटर्स यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. मुस्लीम निर्वासितांच्या प्रवेशावर अमेरिकेत घालण्यात आलेल्या र्निबधांबाबत ग्युटर्स यांच्यावर वार्ताहरांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती.

चिंता आणि संताप पसरेल अशा प्रकारच्या उपाययोजना नसणेच महत्त्वाचे आहे, कारण जागतिक दहशतवादी संघटना सध्या जगात प्रत्येक ठिकाणी भरतीची यंत्रणा ज्या पद्धतीने राबवीत आहेत त्याला गती देण्यास मदत होईल. जनतेला आणि निर्वासितांना अन्य देशांत प्रवेशबंदी केल्याने दहशतवादी घुसखोरी करणार नाहीत याची खात्री देता येत नाही, कारण दहशतवादी संघटना अन्य मार्ग शोधून देशाला आणि तेथील नागरिकांना लक्ष्य करू शकतात, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय समुदाय जागतिक दहशतवादी संघटनांशी सामना करीत आहे, दहशतवादी गटाला एखाद्या देशावर हल्ला करावयाचा असल्यास ते पासपोर्टसह तेथे दहशतवाद्यांना पाठविणार नाहीत, ते अत्यंत विश्वासार्ह, विकसित देशांधून पासपोर्ट घेतील अथवा त्या देशांत अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्यांची मदत घेतील, असेही ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाला अमेरिकेकडून होणाऱ्या निधीच्या पुरवठय़ात ट्रम्प प्रशासन कपात करण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता ग्युटर्स यांनी, जो प्रकार अद्याप घडलाच नाही त्यावर भाष्य करणार नाही, असे स्पष्ट केले. ज्या गोष्टी घडलेल्याच नसतात त्यावर अनेकदा आपण अधिकच भाष्य करतो, असे ते म्हणाले.