राजस्थानमधील भीलवारा जिल्ह्यात एका चार महिन्यांच्या बालिकेचा ताप आणि कफ लोखंडी सळईच्या साहाय्याने बरा करण्याचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. या बालिकेची तब्येत अधिकच बिघडल्याने तिला महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

भीलवारामधील रामखेडा गावामध्ये हा अघोरी प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी या चार महिन्यांच्या बालिकेला ताप व खोकला झाला होता. यावर उपाय करण्यासाठी एका भोंदूबाबाने तिच्यावर लोखंडी सळईच्या साहाय्याने उपचार केले. मात्र तिची तब्येत आणखीनच बिघडली. यानंतर स्थानिकांनी तिला महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सर्व प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

भीलवारामध्ये असे प्रकार नवीन नसून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून बाल कल्याण समितीने तक्रार दाखल केली आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. गेल्या वर्षी एका १० महिन्यांच्या बालिकेलाही उपचाराअभावी जीव गमवावा लागला. तिच्या आजोबांनीच ताप बरा करण्यासाठी असाच प्रकार केला होता.