डॉक्टरांचं खराब अक्षर आणि त्यामुळे रुग्णांना होणारा मनस्ताप यामध्ये नवीन असं काही नाही. मात्र उत्तर प्रदेशातील न्यायालयाने डॉक्टरांच्या खऱाब अक्षराची दखल घेतली असून त्यांना दंड ठोठावला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने खराब अक्षरासाठी तीन वेगवेगळ्या डॉक्टरांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

गेल्या आठवड्यात न्यायालयासमोर तिन्ही प्रकरणांवर सुनावणी झाली. सितापूर, उन्नाव आणि गोंडा जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना मेडिकल रिपोर्ट देण्यात आला होता. मात्र रिपोर्टवरील डॉक्टरांचं अक्षर अत्यंत खराब असून ते वाचणं शक्य नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं.

स्वच्छ आणि समजेल अशा अक्षरात प्रिस्क्रीप्शन लिहा, डॉक्टरांना राज्य सरकारचा आदेश

खंडपीठाने ही प्रकरणं न्यायालयाच्या कामात अडथळा असून डॉ टी पी जैसवाल (उन्नाव), डॉ पी के गोयल (सीतापूर) आणि डॉ आशिष सक्सेना (गोंडा) यांना समन्स जारी केलं. न्यायाधीश अजय लांबा आणि संजय हरकौली यांच्या खंडपीठाने तिन्ही डॉक्टरांना समज देत, न्यायालयाच्या ग्रंथालयात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला. डॉक्टरांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना कामाचा ताण असल्याने रिपोर्टवर अक्षर खऱाब आलं असल्याचा दावा केला.

न्यायालयाने मुख्य सचिव (गृह), मुख्य सचिव (मेडिकल आणि आरोग्य) तसंच महासंचालक (मेडिकल आणि आरोग्य) यांना आदेश दिला असून, भविष्यात मेडिकल रिपोर्ट सोप्प्या आणि चांगल्या भाषेत असले पाहिजेत असं सांगितलं आहे. तसंच हे रिपोर्ट संगणकावर टाईप केलेले असावेत असाही आदेश दिला आहे.

न्यायालयाने यावेळी डॉक्टरांना उत्तर प्रदेश महासंचालकांनी (मेडिकल आणि आरोग्य) नोव्हेंबर 2012 मध्ये काढलेल्या परिपत्रकाची आठवण करुन दिली ज्यामध्ये मेडिकल रिपोर्ट वाचता आलं पाहिजे अशा अक्षरात असावा हा आदेश देण्यात आला होता.