करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने संपूर्ण देशात ४ टप्प्यांमध्ये लॉकडाउन राबवलं. मात्र अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत करण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु करत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील सर्व प्रार्थनास्थळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि प्रार्थनास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायजरची सोय करण्यात यावी असा नियम आखून देण्यात आला आहे. मात्र उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील दर्ग्याने नमाजासाठी येणाऱ्या सर्वांना सॅनिटायजरचा वापर करु नका असं सांगितलं आहे. इस्लाममध्ये दारु पिणं योग्य मानलं जात नाही, सॅनिटायजरमध्ये दारु असल्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.

बरेली जिल्ह्यातील सुन्नी मरकझ दरुल इफ्त या दर्ग्याचे प्रमुख मुफ्ती नसरत फारुखी यांनी मुस्लिम व्यक्तींनी सॅनिटायजरचा वापर करु नये असं म्हटलंय. दर्गा किंवा मशिदीची स्वच्छता करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर केला तर हे ठिकाण अपवित्र होईल. “आम्ही देवाचं घर अपवित्र करु शकत नाही. इस्लाममध्ये दारु पिणं हे निषीद्ध मानलं जातं. सॅनिटायजर बनवण्यासाठी दारुचा वापर केला जातो. ही गोष्ट माहिती असतानाही जर आम्ही सॅनिटायजरचा वापर केला तर ते पाप ठरेल. त्यामुळे मी सर्व दर्गा आणि मशिदीच्या इमाम यांना सॅनिटायजरचा वापर न करण्याचं आवाहन करतो आहे.” फारुखी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.

सॅनिटायजर ऐवजी दर्गा किंवा मशिदीत येणाऱ्या भाविकांनी साबण, कपडे धुवायची पावडर किंवा शँपूने हात धुवून यावेत. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील एका मंदिरातील पुजाऱ्यानेही सॅनिटायजरचा वापर करण्यासाठी मनाई केली होती. भारतात करोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे नष्ट झाला नाही. आजही अनेक भागात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे.