जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपाला अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून नव्या सदस्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी एका दिवसाला जवळपास तीन लाख नवे सदस्य भाजपाशी जोडलेजात होते. परंतु केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता ही संख्या दुपटीपेक्षा अधिक होऊन 6.7 लाख झाली आहे. याव्यतिरिक्त ज्या जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्या ठिकाणीही सदस्यता घेणाऱ्यांची टक्केवारी 70 टक्क्यांपंर्यंत पोहोचली आहे.

मंगळवारी लखनौ येथील प्रदेश मुख्यालयात भाजपाचे पदाधिकारी, क्षेत्रा आणि जिल्ह्यांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महामंत्री सुनिल बन्सल यांनी सदस्य जोडणीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. सध्या 50 लाख लोकांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. हे अभियान 20 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून हा आकडा 80 लाखांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

“जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपाला मोठे यश मिळाले आहे. ज्या ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला त्या ठिकाणीही यश मिळाले आहे. सी ग्रेड बुथवर त्या ठिकाणी असलेल्या एकूण मतदारांच्या संख्येपैकी 60 ते 70 टक्के लोकांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे. 13 ऑगस्टपर्यंत नवे आणि जुने सदस्य मिळून 1 कोटी 36 लाख 36 हजार 316 सदस्य भाजपाशी जोडले गेले असून ही टक्केवारी देशातील भाजपाच्या सदस्यांच्या 30 टक्के आहे,” असे बन्सल म्हणाले. दरम्यान, 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान सदस्यांचे व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे.