उत्तरप्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष आत्तापासूनच सक्रीय झाले आहेत. प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करत आहे. भाजपा आपला जनसंपर्क वाढवत आहे तर समाजवादी पार्टीने प्रचारासाठी एक नवं गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यामध्ये पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचा उल्लेख चक्क मुरलीधर श्रीकृष्ण असा केला आहे.

मुरलीधारी कृष्ण बदलकर वेश आ रहे है, अखिलेश आ रहे है असे या गाण्याचे बोल आहेत. समाजवादी पार्टीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. पक्षाचे नेते राजकुमार भाटी लिहितात की, या गाण्यामध्ये अखिलेश यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांची झलकही दाखवण्यात आली आहे. या गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत काम पोहचवण्याचा प्रयत्न केला असून अखिलेश यांच्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार आहे.


अखिलेश यादव यांनी सध्या भाजपावर टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कायम काही ना काही पोस्ट करत भाजपावर निशाणा साधत असतात. कालच्याच त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी आता भाजपा नको असं म्हणत भाजपाच्या कारभारावर टीका केली आहे.

भाजपाचा भावनिक प्रचार आता चालणार नाही. त्यांना आत्तापर्यंत वाटत आलं की आपण जनतेला बनवलं आहे, त्यांची फसवणूक केली आहे. पण आता जनताच भाजपाला धडा शिकवेल. भाजपाच्या बतावण्या आता खूप झाल्या, असं ट्विट अखिलेश यांनी केलं आहे.