उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पित्याने स्वतःच्या मुलीवर आपल्या मित्रांसोबत  सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माणुसकीला काळीमा फासणा-या या घटनेतील तीनपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य दोन अजूनही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापाचं वय 50 वर्ष आहे. 15 एप्रिल रोजी ते कमालपूर येथील एका जत्रेत गेले होते. संध्याकाळी तेथून परतल्यानंतर आपला मित्र मान सिंह याला त्यांनी घरी बोलावले. घरी आल्यावर आरोपी बापाने आपल्या मुलीला ( वय -35) मान सिंह याच्यासोबत मोटार सायकलवर जाण्यास सांगितलं. मान सिंह तिला घेऊन दुसरा मित्र मेराज याच्या घरी पोहोचला.

आरोपी बाप अजूनही फरार-
मेराजच्या घरी तिघांनी मिळून बलात्कार केला असा पीडितेचा आरोप आहे. त्याच्या घरी तिला 18 तास डांबून ठेवण्यात आलं होतं, अखेर सोमवारी संध्याकाली तिला तेथून सोडण्यात आलं. घरी परतल्यावर तिने आपल्या आईला सर्व घटना सांगितली, त्यानंतर दोघींनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मेराज याला अटक केली. मात्र, पीडितेचा बाप आणि मान सिंह हे अजूनही फरार आहेत. कमालपूर येथे मेराज एक क्लिनीक चालवतो, पण पोलिसांनी त्याला डॉक्टरकीचं प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितलं तेव्हा त्याला ते दाखवता आलं नाही अशी माहिती आहे.