गोरखधाम रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २५ वर पोहोचली आहे. सोमवारी रात्रीपासून मदतकार्य पथकाला आणखी ११ मृतदेह मिळाले आहेत. या अपघातात १०३ प्रवासी जखमी झाले आहेत, असे जिल्हा दंडाधिकारी भरत लाल यांनी सांगितले. दरम्यान, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयांचे सानुग्र अनुदान जाहीर केले.
लोहमार्गावर असलेले गाडीचे डबे दूर करण्यासाठी गॅसकटरचा वापर केला जात असून लवकरच रेल्वे मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोरखधाम एक्स्प्रेस रुळांवरून घसरून नजीकच असलेल्या मालवाहू गाडीवर आदळल्याने ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत गाडीच्या सहा डब्यांचे नुकसान झाले आहे. लोहमार्ग खराब असल्याने सदर दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.