अनेक गैरव्यवहारांनी झाकोळूनही काँग्रेसप्रणीत सरकार केवळ ‘सीबीआय’च्या जोरावर संसदेत कृत्रिम बहुमत प्रस्थापित करून तग धरून आहे, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी बुधवारी ‘प्रेस ट्रस्ट’ या वृत्तसंस्थेशी बोलताना केला. इतकेच नाही तर भाजपबरोबर ‘मॅच फिक्सिंग’ करून संसदेचे कामकाज या सरकारनेच रोखून धरले आहे, असा गंभीर आरोपही येचुरी यांनी केला. या सरकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी लोकांचे डोळे दिपले आहेत.
भाजपप्रणीत सरकारच्या काळात जसा श्रीमंतांसाठी एक ‘शायनिंग इंडिया’ होता तसाच गरिबांचा ‘सफरिंग इंडिया’ही होता. तेच आज पुन्हा घडत आहे. या सरकारनेच संसदेचे अवमूल्यन केले असून आपल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी भाजपशी संधान बांधून कामकाज रोखवले आहे, असेही ते म्हणाले. लोकांशी नाळ तुटलेले हे सरकार आता अखेरच्या वर्षांत अन्नसुरक्षेचे विधेयक गाजावाजा करीत आणत आहे. प्रत्यक्षात चार वर्षांपूर्वी या विधेयकाचे आश्वासन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाद्वारे याच सरकारने दिले होते, असा टोलाही त्यांनी हाणला.