बहुचर्चित अन्नसुरक्षा योजनेचा अध्यादेश मागे घेत केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारने बुधवारी अन्नसुरक्षा विधेयक लोकसभेमध्ये सादर केले. देशातील ६० टक्के जनतेला अल्पदरात अन्नपुरवठ्याची हमी अन्नसुरक्षा योजनामुळे मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने ही योजना सुरू करण्यासाठी अन्नसुरक्षा अध्यादेश काढला होता. मात्र, त्यावर विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली होती. भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी अध्यादेशामुळे कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. 
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे सरकारने अध्यादेश मागे घेत अन्नसुरक्षा विधेयक संसदेत सादर केले. अन्नधान्य पुरवठामंत्री के. व्ही. थॉमस यांनी हे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले. विधेयकावर पुढील आठवड्यात लोकसभेत चर्चा होणार आहे.