संयुक्त पुरोगामी आघाडी ही निवडणूकपूर्व आघाडी असून संपुआकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे विधान सरकारकडून करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर शर्मा यांनी संपुआ यासाठी दावेदार असल्याचे स्पष्ट केले.
‘घटनात्मक गरजा पूर्ण करायच्या असतील तर संपुआ ही निवडणूकपूर्व आघाडी आहे आणि संपुआचे एकत्रित मिळून पुरेसे संख्याबळ असून त्याआधारे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाला संपुआ दावा करील,’ असे शर्मा म्हणाले. सरकार स्थापनेच्या वेळी रालोआ किंवा संपुआ दोन्ही आघाडय़ा निवडणूकपूर्व आघाडय़ा असून राष्ट्रपतींना त्या मान्य होत्या. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत पर्याय शोधणे आवश्यक आहे, असे त्यांनी एका टीव्हीवरील कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
यापूर्वी संसदीय कामकाजमंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी अद्याप लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणीही दावा केलेला नाही, असे म्हणत काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
मालवणकर फॉम्र्युलानुसार ५४३ सदस्यांच्या लोकसभा सदनातील १० टक्के जागा विरोधी पक्षाकडे असल्या तरच प्रमुख विरोधी पक्षाचा विरोधी पक्षनेता निवडता येतो. या फॉम्र्युलाचा संदर्भ देऊन सरकारने काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश केला होता. या फॉम्र्युलानुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा आवश्यक असून काँग्रेसकडे ४४ जागा आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी मात्र मालवणकर फॉम्र्युलामध्ये २००२ साली संसदीय कायद्यात सुधारणा करण्यात आली असून, ५५ जागांची गरज वगळण्यात आली असून लोकसभेतील विरोधी पक्षाकडे सर्वाधिक जागा असतील तर त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता निवडणे क्रमप्राप्त ठरते, असे म्हटले.
शर्मा यांनी मंत्र्यांवर टीका करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड  हा लोकसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतील विषय असूनही सरकारमधील मंत्री त्याबाबत उलटसुलट विधाने करीत असून ते चुकीचे आहे, असेही शर्मा यांनी नमूद केले.