आंध्र प्रदेशच्या विभाजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या शिफारशींवर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मंत्रिगटाने आपल्या शिफारशीमध्ये रायलसीमा भागातील दोन जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केल्याचे मानले जात आहे.
तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध असतानादेखील रायलसीमा भागातील कर्नुल आणि अनंतपूर हे जिल्हे नव्या राज्यात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. हा प्रस्ताव जर मान्य झाला तर दोन्ही राज्यांमध्ये लोकसभेच्या प्रत्येकी २१ आणि विधानसभेच्या १४७ तर विधान परिषदेच्या ४५ जागा असतील. दोन्ही राज्यांची हैदराबाद राजधानी असेल. मंत्रिमंडळाने संमती दिल्यावर हिवाळी अधिवेशनात त्याबाबतचा प्रस्ताव मांडला जाईल.