गुलाम नबी आझाद यांनी माफी मागावी -भाजपची मागणी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसशी तुलना केल्याच्या प्रकरणावरून सोमवारी राज्यसभेत सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झडली.
गुलाब नबी आझाद यांनी आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी सत्तारूढ पक्ष आणि मंत्र्यांनी केली. मात्र आपण संघ परिवार आणि आयसिसची तुलना केल्याच्या वृत्ताचे आझाद यांनी जोरदार खंडन केले. आपल्या भाषणाची सीडी सरकारकडे देण्याची तयारी आझाद यांनी यावेळी दर्शविली, इतकेच नव्हे तर त्यामध्ये काही गैर आढळल्यास हक्कभंगाला सामोरे जाण्याचीही आपली तयारी असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले. आम्ही ज्याप्रमाणे संघाला विरोध करतो त्याप्रमाणेच आयसिसलाही विरोध करतो, इस्लाममधील एकाद्याने गैरकृत्य केले तर ते कृत्यही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखेच आहे, यामध्ये तुलना कोठे आली, असा सवाल आझाद यांनी केला. आयसिस आणि संघ हे दोन्ही एकच आहेत, असे वक्तव्य केले असते तर ती तुलना झाली असती. हिंदू, मुस्लीम आणि शीख मूलतत्त्ववादी हे देशविरोधी असल्याने त्यांच्याविरोधातही लढले पाहिजे, असे आपण म्हणालो. या बाबत सभागृह नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, आझाद यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिश: आदर आहे, मात्र त्यांनी जाणतेपणे किंवा अजाणतेपणे हे वक्तव्य केले का याचा विचार करावा, तुम्ही आयसिसला सन्मान दिला, असे जेटली म्हणाले.

विचारसरणीचा लढा..
आरक्षणाबाबत संघ परिवाराच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी चिंता व्यक्त केली त्याबाबत संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बस नक्वी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत असताना आझाद यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. तेव्हा आजाद यांनी, जमियात उलामा-ए-हिंदने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील आपले भाषण वाचून दाखविले. भारतात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात लढा नाही तर विचारसरणीचा लढा सुरू आहे, असे वक्तव्य आपण केल्याचे आझाद म्हणाले.