उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जौहर अली विद्यापीठात बांधलेले उर्दू प्रवेशद्वार (गेट) योगी सरकार पाडण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या बाहेर असलेल्या उर्दू गेटवर आझम खान यांचे विशेष प्रेम असल्याचे सांगण्यात येते. समाजवादी सरकारच्या कार्यकाळात हे गेट बांधण्यात आले होते. योगी सरकारने उर्दू गेट अवैध असल्याचे जाहीर केले आहे. नियमबाह्यपणे बाधण्यात आलेले हे गेट आता पाडण्याची तयारी सुरू आहे.

समाजवादी सरकारच्या कार्यकाळात उर्दू गेट उभारण्यासाठी ४० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला होता. हे गेट अवैध असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी अहवालात जिल्हाधिकाऱ्यांनी या गेटमुळे वाहन चालवताना वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते.

उर्दू गेट रामपूर जिल्ह्याला उत्तराखंडशी जोडते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. अनेकवेळा वाहतूक कोंडीच्या तक्रारी प्रशासनाकडे येत. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे गेट अवैध असल्याचे घोषित केले होते. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर योग्य ते पाऊल उचलण्यास सांगितले होते, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उर्दू गेट पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपची सत्ता येताच आजम खान यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे नेते माजी आमदार नवाब काजिम अली खान, भाजप नेते आकाश कुमार सक्सेना आणि काँग्रेसचे फैसल खान यांनी राज्य सरकारला पत्र लिहून उर्दू गेटबाबत तक्रार केली होती. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय कुमार श्रीवास्तव यांनी सरकारच्या आदेशानुसार कारवाई करणार असल्याचे सांगितले.