माहितीजालाच्या युगात फेसबुक, वॉट्सअॅप, टि्वटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. व्यक्त होण्यासाठीचे हे अतिशय सोपे आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम आहे. परंतु, अनेकवेळा याचा गैरवापर होताना पाहायला मिळतो. समाजमाध्यमांवर शिकार झालेल्या व्यक्तीला फार मोठ्याप्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. हा त्रास सहन न झालेल्या काहींनी तर समाजमाध्यमांना रामराम करत त्यांची खाती बंद केली. यूपीएससी परीक्षेत अव्वल आलेल्या टीना दाबीला काहीशा अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. फेसबुकवर तिच्या नावाची एक-दोन नव्हे तर तब्बल ३५ खोटी खाती उघडण्यात आली असून, या खात्यांचा वापर करून हे दुष्कृत्य करणारे त्यांचे विचार समाजात पसरवत आहेत. वॉट्सअॅपवर आलेल्या एका संदेशामुळे टीनाला याबाबत समजले. तिच्या नावाचा वापर करून उघडण्यात आलेली खोटी खाती बंद करण्यात आल्याचे फेसबुकद्वारेदेखील तिला कळविण्यात आले. आपल्या नावाचा वापर करून पसरविण्यात आलेले वाह्यात संदेश हे आपण पोस्ट केले नसल्याचे तिने स्वत:च्या अधिकृत फेसबुक खात्यावरून स्पष्ट केले आहे. तिच्या नावाचा वापर करून समाजमाध्यामांवर पोस्ट करण्यात आलेल्या संदेशांमध्ये, ‘प्रिय व्यक्त्यय मी तुम्हाला खल्लास करेन…’ ‘देवा सर्वांना आनंदाने जगण्यासाठी संयम आणि प्रोत्साहन दे’ अशाप्रकारच्या अनेक संदेशांचा समावेश आहे. तर अन्य एका खोट्या आयडीवरून तिच्या नावे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात आले. त्या संदेशातील मजकूर काहीसा असा आहे, हे सर्व करण्यासाठी मला कोणी प्रेरीत केले ते मी जाणते, ते कोणी अन्य नसून आपले पंतप्रधान मोदी आहेत. एससी वर्गातील असल्यामुळे मी काय केवळ आंबेडकरांनाच माझी प्रेरणा मानत राहू? मी बाबासाहेबांचा मान करते. मागासलेल्या जनांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. त्यांनी नेहमीच दलितांच्या उद्धारासाठी काम केले असून, आरक्षणात वाढ व्हावी या मताचे ते कधीच नव्हते. संविधानाद्वारे फार कमी काळासाठी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली असली तरी राजकीय नेत्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हे हत्यार बनविले.

tina-msg759
आपल्या नावाचा दुरुपयोग केला जात असल्याचे लक्षात आल्यावर व्यथित झालेल्या टीना डाबीने आपण केवळ २२ वर्षांची साधारण मुलगी असून, नाहक आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ओढण्यात येत असल्याचा खुलासा केला. समाजातील अशा जनांमुळे अतिशय मेहनतीने प्राप्त केलेल्या आपल्या यशाचा आनंद उपभोगता येत नसल्याने आपण खूप दु:खी असल्याची भावना तिने व्यक्त केली.