पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळालेल्या पतीने शामीरपेठ येथील राहत्या घरी आत्महत्या केली. के. आचार्य (२४) असे मृताचे नाव असून पेशाने तो इलेक्ट्रीशिअन होता. यादाद्री भोनगीर जिल्ह्यातील अलएअर मंडळ येथील शामीरपेठ भागात आचार्य पत्नीसह राहत होता. आत्महत्या करण्यापूर्वी आचार्यने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराबरोबर लग्न लावून देण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.

आचार्यचे दोन वर्षांपूर्वी उषा राणीबरोबर लग्न झाले. त्यांना एकवर्षाची मुलगीही आहे. वर्षभरापूर्वी नोकरीच्या शोधात आचार्य त्याच्या कुटुंबांबरोबर शामीरपेठ येथे राहायला आला. तो एका खासगी कारखान्यात इलेक्ट्रीशिअन म्हणून नोकरीला राहिला. बुधवारी सकाळी आचार्यने आपण शेजारी राहणाऱ्या श्रीकांत नावाच्या व्यक्तिमुळे आत्महत्या करत आहोत असा वडिल के. सत्यनारायण यांना एसएमएस पाठवला. आचार्यला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला पण आचार्यचा फोन स्विच ऑफ येत होता.

आई-वडिल लगेच आचार्यच्या घरी पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला, पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये पत्नीचे शेजारी राहणाऱ्या श्रीकांतबरोबर प्रेमसंबंध असल्याचे म्हटले होते. आई-बाबा मला माफ करा. माझ्यासारखा मुलगा कुठल्याही आई-वडिलांना मिळू नये. मी अपयशी ठरलो आहे. माझ्या पत्नीचे श्रीकांतबरोबर लग्न लावून द्यावे तीच माझी शेवटची इच्छा आहे असे या पत्रात म्हटले होते. सत्यनारायण यांच्या तक्रारीवरुन कलम १७४ अंतर्गत संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर रुग्णालयाने आचार्यचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.