प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदौरींना व्हिसा देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे पुढील महिन्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना तेथे जायचे होते. कार्यक्रम संपल्यानंतर भारतात परतणार असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांना समजाविण्यास आपण असमर्थ ठरल्याचे इंदौरी यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक माहिती देताना इंदौरी म्हणाले, मी नॉन इमिग्रेंट व्हिसासाठी अर्ज भरला होता. अमेरिकन वकिलातीतर्फे मला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. तेथील अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे देत कार्यक्रम संपल्यानंतर मी भारतात परतणार असल्याचे सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्याचे सांगत यावेळी व्हिसा मिळणार नसल्याचे सांगितले. मुलाखतीनंतर अमेरिकन वकिलातीने माझे पारपत्र परत केले. इंदौरी पुढे म्हणाले, आधारहिन पूर्वग्रहामुळे मला व्हिसा नाकारण्यात आला. भारतसोडून मी अमेरिकेत स्थायिक होईन, अशी भीती अमेरिकन अधिकाऱ्यांना होती. परंतु, भारतात मला खूप सन्मान मिळतो. येथे माझे कुटुंबीय राहतात. या गोष्टींशी अमेरिकन अधिकाऱ्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचे मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे. गेल्या दहा वर्षांत इंदौरी ११ वेळा अमेरिकेत जाऊन आले आहेत. आपल्याला व्हिसा नाकारण्यापूर्वी वकिलातीमधील अधिकाऱ्यांनी आपले मागील रेकॉर्ड तपासायला हवे होते, अशी भावना इंदौरी यांनी व्यक्त केली.