अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. ट्रम्प भारतात येणार असले तरी, दोन्ही देशांमध्ये व्यापारावरुन मतभेद कायम आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यात कुठल्याही व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी व्यापाराच्या मुद्दावरुन आपली नाराजीही प्रगट केली आहे. भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही असेही ट्रम्प म्हणाले होते.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात विविध संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. पण व्यापारी करारावर एकमत व्हावे, यासाठी मागच्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या अधिकारीवर्गामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. भारताची काही मुद्दावर तयारी होती, पण अमेरिकेनेच शेवटच्या क्षणाला या करारातून माघार घेतली. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात छोटयात छोटा व्यापारी करार व्हावा, यासाठी दोन्ही देशांच्या अधिकारी वर्गामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. पण अमेरिकेला मोठा आणि त्यांच्या हिताचा करार हवा असल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी व्यापारी करारावर शिक्कामोर्तब करण्यास नकार दिला.

भारतात मोठया प्रमाणावर कर आकारला जातो. त्यामुळे अमेरिकी कंपन्यांचे नुकसान होते असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे तसेच अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठामध्ये जास्तीत जास्त प्रवेश देण्याच्या मुद्दावरुनही मतभेद आहेत.

ट्रम्प धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा मांडणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेत उपस्थित करणार आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याबाबतचे मुद्दे या अनुषंगाने ट्रम्प उपस्थित करतील असे सूतोवाच यावेळी करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉन्फरन्स हॉलमधील कार्यक्रमात सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प हे दोन्ही देशांची लोकशाही परंपरा व धार्मिक स्वातंत्र्य या मुद्दय़ांवर मते मांडतील. धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा असून तो ठोसपणे मांडला जाईल.