भारत आणि पाकिस्तान यांच्या वाढत्या तणावामुळे चिंतेत असलेल्या अमेरिकेने दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी त्वरीत पाऊल उचलण्याचे अपील केले आहे. यापुढे एकानेही सैन्य कारवाई केली तर दोन्ही देशांसाठी ते धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दोन्ही देशांनी यासाठी त्वरीत पाऊल उचलावे आणि थेट संवादावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. लष्करी हालचालींमुळे तणावाची तीव्रता वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

नुकताच सीमारेषेपलीकडील दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीएफ दलावर हल्ला करून गंभीर धोका निर्माण केला आहे. आम्ही पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिलेल्या वचनबद्धतेचे पालन करण्याची विनंती करतो. त्यांनी दहशतवाद्यांना आसरा देऊ नये आणि त्यांचा निधी रोखावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ दलावर आत्मघातकी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय वायूसेनेने पीओकेतील जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. भारताने पाकिस्तानचे एक विमान पाडले तर एक भारतीय वैमानिक सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. यामुळे दोन्ही देशात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दोन्ही देशांना संयमाचा सल्ला दिला आहे.