सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. मतदान प्रक्रियेसाठी चार दिवसांचा कालावधी राहिले असून आता प्रचारही शिगेला पोहोचला आहे. जो बायडेन यांचं फ्लोरिडा येथील भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवलं. गेल्या वर्षी साताऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक पाऊस आला होता. त्यावेळी त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरू ठेवलं होतं. त्याचा निवडणुकीतील प्रचारावर मोठा प्रभावही दिसून आला होता.

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पावसात सुरू असलेल्या प्रचारसभेचा फोटो शेअर केला आहे. “वादळं जातील आणि नवा दिवसही येईल,” असं कॅप्शन बायडेन यांनी या फोटोला दिलं आहे. फ्लोरिडामध्ये बायडेन यांच्या सुरू असलेल्या प्रचारादरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. परंतु बायडेन यांनी आपलं भाषण न थांबवता पावसातही ते सुरू ठेवलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय घेऊन याचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला आलेले लोक आपल्या कारमध्ये बसून बायडेन यांचं भाषण ऐकत होते. दरम्यान, बायडेन यांनी अमेरिकेतील नागरिकांची मनं जिंकली असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

बायडेन यांच्या या भाषणानंतर काही नेटकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आठवण काढली. गेल्या वर्षी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अचानक पावसाला सुरूवात झाली होती. परंतु त्यावेळी शरद पवार यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवलं होतं. त्यांच्या या भाषणाचा निवडणुकीच्या प्रचारावर मोठा प्रभाव पडला होता.