अमेरिकेत येणा-या मुस्लिम निर्वासितांना प्रवेशबंदी करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दणका दिला आहे. अमेरिकेतील विमानतळावर खोळंबलेल्या व्हिसाधारक निर्वासितांना पुन्हा मायदेशी पाठवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विमानतळाबाहेर जमलेल्या आंदोलकांनी एकच जल्लोष केला आहे.

मुस्लीम बहुल देशातील कट्टरतावादी (मूलतत्त्ववादी) लोकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करतानाच सीरियातील निर्वासितांना पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. मूलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी हा आदेश जारी केला. इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांमधील निर्वासितांनाही देशात बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने अमेरिकेतील विमानतळांवर शेकडो प्रवासी खोळंबले होते. यातील अनेक जण ट्रम्प यांनी निर्णयावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच अमेरिकेच्या दिशेने निघाले होते. मात्र अमेरिकेत दाखल होताच त्यांना संबंधीत यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. यातील इराक आणि येमेनमधील काही निर्वासितांना परतदेखील पाठवण्यात आले होते. न्यूयॉर्कमधील न्यायालयाने विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा दिला. अमेरिकेचा व्हिसा असलेल्या  पण विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता पुढील आदेशापर्यंत या सर्वांना कुठे ठेवले जाईल, त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.  हा निर्णय फक्त विमानतळावर खोळंबलेल्या प्रवाशांसाठीच हा निर्णय लागू राहणार आहे. या निर्णयामुळे किमान १०० ते २०० प्रवाशांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.

अमेरिकेतील जेडब्ल्यूएफ विमानतळाबाहेर हजारो नागरिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. अमेरिकेत निर्वासितांचे स्वागत आहे असे फलक हाती घेऊन या आंदोलकांनी ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.