डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चार टक्क्यांची आघाडी

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना मतदारांचा पसंतीकौल लक्षवेधक ठरला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्क्यांची आघाडी घेतली आहे.

अध्यक्षीय निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच मतदारांचा पसंतीकौल हिलरी यांच्या बाजूने आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत वेळोवेळी घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांत या दोन उमेदवारांच्या मतांमध्ये एक ते १२ टक्क्यांचा फरक नोंदविण्यात आला. गेल्या जनमतचाचणीत हिलरी केवळ एक टक्क्यानेच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही लढत आणखी अटीतटीची बनली. मात्र, वॉल स्ट्रीट जर्नल-एनबीसी न्यूजने केलेल्या ताज्या मतचाचणीत हिलरी यांना ४४ टक्के मतदारांनी पसंती दिली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना ४० टक्के उमदवारांनी पाठिंबा दिला आहे. इतर जनमत चाचण्यांत टक्केवारीमध्ये फरक असला तरी हिलरी यांनी आघाडी कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेल प्रकरणाचा फटका

ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हिलरी क्लिंटन यांच्याकडे सुमारे ११ ते १२ टक्के मतांची आघाडी असल्याचे जनमतचाचण्यांत स्पष्ट झाले होते. मात्र, हिलरी यांच्या कथित ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय ‘एफबीआय’ने घेतल्यानंतर हिलरींना मतदारांचा असलेला पाठिंबा घटला. त्याच वेळी त्यांचे प्रतिस्पर्धी ट्रम्प यांचा पसंती वाढू लागली. मात्र, हिलरींवर आघाडी मिळविण्यात ट्रम्प यांना यश आले नाही.