दहशतवाद्यांच्या छायेत जगत असलेल्या देशांची यादी अमेरिकेने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारत पाकिस्तानच्याही पुढे आहे. म्हणजे २०१६ मध्ये भारतात पाकिस्तानपेक्षा अधिक दहशतवादी हल्ले झाले आहेत. या यादीनुसार सर्वाधिक दहशतवादी हल्ले हे इराकमध्ये झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान असून तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. याआधी या स्थानी पाकिस्तान होता.

अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये जगातील विविध ठिकाणी ११,०७२ दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये ९२७ म्हणजे एकूण १६ टक्के हल्ले भारतात झाले आहेत. २०१५ मध्ये ७९८ हल्ले झाले होते. या हल्ल्यात जीव गमवावा लागणाऱ्यांच्या संख्येत १७ टक्क्यांनी वाढ झाली. वर्ष २०१५ मध्ये हल्ल्यांची संख्या २८९ होती जी २०१६ मध्ये ६३६ इतकी झाली. याच्या अगदी विरूद्ध पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची संख्या घटली आहे. २०१५ मध्ये तिथे १०१० हल्ले झाले. २०१६ मध्ये ७३४ पर्यंत घसरण झाली.

या अहवालात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नक्षली संघटनांना जगातील तिसरी सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आयसीस आणि तालिबाननंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. नक्षलवाद्यांना बोको हरमपेक्षाही क्रूर असल्याचे यात म्हटले आहे. २०१६ मध्ये झालेल्या ३३६ हल्ल्यांमागे सीपीआयचा (माओवादी) हात आहे. यामध्ये १७४ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून १४१ जण जखमी झाले. २०१६ मध्ये सर्वाधिक भीषण हल्ला बिहारमध्ये झाला होता. यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) १६ जवान शहीद झाले होते. हा हल्ला नक्षलवाद्यांनी केला होता.

२०१६ मध्ये अर्ध्याहून अधिक दहशतवादी हल्ले हे चार राज्यांत झाले. यामध्ये जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक वाईट स्थिती जम्मू काश्मीरची आहे. मागील वर्षी अशा हल्ल्यांत ९३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. परंतु, गृहमंत्रालयाच्या अहवालात ५४ टक्क्यांनी हल्ले वाढल्याचे सांगण्यात आले होते. या अहवालानुसार, अपहरण, बंदी बनवण्याच्या प्रकरणांत ६३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१५ मध्ये अशी ८६६ प्रकरणे होती. तर २०१६ मध्ये हा आकडा ३१७ पर्यंत आला.

भारतात दहशतवादी हल्ले करणारे एक-दोन नव्हे तर सुमारे ५२ संघटना असल्याचे या अहवालात म्हटले आहे. इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी मोठी आहे.