मोदी, शहा यांची योगी आदित्यनाथ यांना विचारणा

उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला धक्कादायक पराभव आणि चार दलित खासदारांनी अलीकडेच राज्याच्या नेतृत्वाबाबत व्यक्त केलेली नाराजी याची भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून उत्तर प्रदेशात जे काही सुरू आहे त्याबाबत आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कानावर घातली असल्याचे कळते.

गेल्या शनिवारच्या दिल्ली भेटीत योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली. काही बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरल्याबद्दल शहा यांनी या वेळी आपली नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली. राज्यातील वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी शहा आता ११ एप्रिलला लखनौला जाणार आहेत.

रा.स्व. संघाच्या कृष्ण गोपाल व दत्तात्रय होसबले या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उत्तर प्रदेशला भेट दिली होती. या भेटीत दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, संघाचे नेते, तळागाळातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या प्रतिक्रिया त्यांनी घेतल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान व पक्षाध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण विचारण्यास महत्त्व आहे.

अधिकृतरीत्या, योगी यांनी मोदी व शहा यांना भेटणे ही चर्चेसाठी झालेली ‘सदिच्छा भेट’ असल्याचे सांगण्यात आले. तथापि, या भेटीचा परिणाम लवकरच दिसेल आणि येत्या काही दिवसांत सरकार आणि संघटनेत काही मोठे बदल पाहायला मिळतील, असे सूत्रांनी सांगितले.

भीषण आणि रानटी राज – राहुल गांधी

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार असताना भाजपने ‘गुंडाराज’ची उपमा देत टीका केली होती. मात्र आता भाजपच्या सरकारद्वारे ही प्रतिमा बदलण्यात येऊन ‘भीषण आणि रानटी राज’ झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. बलात्कारपीडितेवर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याची वेळ येणे आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू होणे ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचे ट्वीट त्यांनी केले.