उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सकाळी एन्काऊंटर करत दोघांची गोळ्या घालून हत्या केली. हा एन्काऊंटर पाहण्यासाठी पोलिसांनी चक्क पत्रकारांना निमंत्रण दिलं होतं. इतकंच नाही तर हा एन्काऊंटर कॅमेऱ्यात शूट करण्याचाही परवानगी देण्यात आली होती. एन्काऊंटरचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये पोलीस नेम लावून दोघांची गोळ्या घालून हत्या करत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी आपण गेल्या काही दिवसांपासून मुस्तकीम आणि नौशाद यांचा शोध घेत होतो असं सांगितलं आहे.

दोघा आरोपींवर गेल्या महिन्यात सहा जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. यापैकी दोघे हिंदू पंडित होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘आज सकाळी ६.३० वाजता हा प्रकार घडला. दोघेजण दुचाकीवरुन चालले असता पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांचा पाठलाग केला असता ते एका रिकाम्या सरकारी इमारतीत जाऊन लपले. तेथूनही ते आमच्यावर गोळीबार करत होते. आम्ही जेव्हा त्यांना प्रत्युत्तर दिलं तेव्हा दोघांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. आमचा एक अधिकारी जखमी झाला आहे’, अशी माहिती अलीगढचे पोलीस आयुक्त अजय साहनी यांनी दिली आहे.

आरोपींनी ज्यांची हत्या केली होती त्यामध्ये दोन हिंदू पंडित, एक दांपत्य आणि दोन शेतकऱ्यांचा समावेश होता. मार्च २०१७ पासून म्हणजेच योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपद हाती घेतल्यापासून आतापर्यंत उत्तर प्रदेशात ६६ जणांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. चकमकींची संख्या एक हजाराहून जास्त आहे. अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी एन्काऊंटरचा रणनीती म्हणून वापर करण्यात आल्याचं उत्तर प्रदेशचे पोलीस प्रमुख ओ पी सिंह यांनी सांगितलं होतं.