पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसने उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा मुलगा साकेत आणि पक्षाचे सहचिटणीस अनिल गुप्ता यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले.
उत्तराखंडमधील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून भाजपने तेथील मुख्यमंत्री हरीश रावत यांचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पॉल यांनी मुख्यमंत्री हरिश रावत यांना २८ मार्चपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे नऊ बंडखोर आमदार दिल्लीला पोहोचले आहेत. यापैकी साकेत बहुगुणा यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीच्या आधारावर त्यांना आणि अनिल गुप्ता यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस राज्यातील शिस्तपालन समितीने प्रदेश काँग्रेसकडे केली होती. या शिफारशीच्या आधारावरच त्या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे किशोर उपाध्याय यांनी सांगितले. साकेत बहुगुणा यांनी दोनवेळा तेहरीमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती.
पक्षशिस्त मोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माफ करण्यात येणार नसून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही किशोर उपाध्याय यांनी सांगितले.